संदेरी जंगलात आढळली ‌‘वाघाटी’

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यातील संदेरी परिसरात मंगळवारी (दि.12) सकाळच्या सुमारास एका शेतकऱ्याला दोन दुर्मिळ ‘वाघाटी’ प्रजातींची पिल्ले आढळून आली. ही पिल्ले आढळताच स्थानिकांमध्ये सुरुवातीला बिबट्याच्या पिल्लांचा समज झाल्याने काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पशुधन विकास अधिकारी पूजा चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत दोन्ही पिल्लांची पाहणी केली. तपासणीअंती ही पिल्ले आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ही पिल्ले बिबट्याची नसून ‌‘वाघाटी’ या संकटग्रस्त जंगली मांजरीच्या प्रजातीची असल्याचा खुलासाही वनविभागाच्यावतीने करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनंतर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, वनविभागाने योग्य तपासणी करून परिस्थिती स्पष्ट केली.

‌‘वाघाटी’ ही जगातील सर्वात लहान जंगली मांजर प्रजातींपैकी एक असून तिचे वास्तव्य मुख्यतः झुडपी जंगले, गवताळ प्रदेश व खडकाळ भागात आढळते. तिचे खाद्य उंदीर, लहान सस्तन प्राणी, सरडे व लहान पक्षी असे असते. या प्रजातीचे अस्तित्व भारत, श्रीलंका आणि नेपाळमध्ये नोंदले जाते. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे यांनी सांगितले की, जंगललगतच्या वस्ती, आदिवासी पाडे व परिसरातील नागरिकांमध्ये वनसंपत्तीचे संवर्धन व संरक्षण याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. यावेळी संजय खांबेटे, वनपाल मांदाटणे, तुळशीराम चावरेकर, वनरक्षक प्रियांका जाधव, वनपाल वैभव शिंदे, सुभाष शिंदे, सचिन चव्हाण व प्रदीप कोरडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version