वहूर जेटी वादाच्या भोवऱ्यात

निकृष्ट कामामुळे अडीच कोटी सावित्रीत ‌‘वाहणार’; सागरी मंडळावर गंभीर आरोप

| महाड | जुनेद तांबोळी |

महाड तालुक्यातील वहूर येथे उभारण्यात आलेल्या जेटीच्या कामात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे तब्बल 2.5 कोटी रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महाड तालुक्यातील सव येथील गरम पाण्याच्या कुंडांना जाण्यासाठी सावित्री नदी पार करावी लागते. यासाठी पर्यटकांच्या सोयीसाठी वहूर येथे जेटी उभारण्याचे काम महाराष्ट्र सागरी मंडळाकडून हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम पूर्ण होण्याआधीच निकृष्ट दर्जामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. सुमारे 2 कोटी 42 लाख रुपयांचे हे काम पोलादपूर येथील एस.जे. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात नवीन जेटी उभारण्याऐवजी जुन्या जेटीवर केवळ सहा इंच काँक्रिट टाकून काम पूर्ण केल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. यासोबतच वाळूऐवजी ग्रिटचा वापर करून दर्जाहीन बांधकाम करण्यात आल्याचेही समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काम सुरू असताना सागरी मंडळाचा एकही अभियंता किंवा अधिकारी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित नव्हता. त्यामुळे ठेकेदाराने मनमानी करत घाईघाईत काम पूर्ण केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.



जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही वादग्रस्त ठरले आहे. काँक्रिट रस्त्यासाठी निकृष्ट दर्जाचा डबर वापरण्यात आल्याचे समोर आले असून, याबाबत गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. वहूर जेटी प्रकरणामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अडीच कोटी रुपयांचा निधी अक्षरशः पाण्यात जाण्याची वेळ आली असताना, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासगी प्लॉटधारकाला फायदा?
या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे, जेटीच्या नावाखाली सावित्री नदीत संरक्षक भिंत उभारण्यात आली, मात्र ती प्रत्यक्षात एका खाजगी प्लॉटधारकाच्या फायद्यासाठी असल्याची चर्चा रंगली आहे. शासनाचा निधी वापरून खाजगी मालमत्तेला संरक्षण देण्यात आल्याचा आरोप होत असून, यामुळे प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे.
रस्ता खासगी जमिनीतून; ‌‘सुविधा' की संगनमत?
जेटीकडे जाणारा रस्ता देखील संबंधित खाजगी प्लॉटधारकाच्या जमिनीतून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्या प्लॉटला थेट रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप होत आहे. हा सर्व प्रकार नियोजनबद्ध संगनमतातून झाला का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
रस्त्यातच विद्युत खांब; प्रशासन बेफिकीर?
जेटीकडे जाणाऱ्या नव्या काँक्रिट रस्त्याच्या मधोमधच विद्युत खांब उभा असल्याचे समोर आले आहे. तो न हटवता रस्ता बांधण्यात आल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित खांब हलवण्यासाठी खर्च कोण करणार, यावरही संभ्रम आहे.
निकृष्ट काम, अधिकाऱ्यांची ‌‘संमती'?
जेटी आणि रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असतानाही सागरी मंडळाचे अधिकारी ठेकेदाराची पाठराखण करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे चित्र समोर येत आहे.
Exit mobile version