| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल आणि रिअल अकॅडमीची इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी वैभवी वारगे हिने आपल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल सायन्स कलाम स्ट्रीम 2026 या उपक्रमात सहभाग घेतल्यानंतर तिची आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्राला दि.18 नोव्हेंबर रोजी शैक्षणिक भेट देण्यासाठी निवड झाली आहे. या शैक्षणिक भेटीदरम्यान वैभवीला भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच, रॉकेट प्रक्षेपण केंद्र, लॉन्च पॅड आणि अंतराळ मोहिमांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेता येणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विज्ञानविषयक विचारांपासून प्रेरणा घेतलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि अंतराळ विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे हा आहे.






