पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

रक्षाबंधनाच्या दिवशीच नवविवाहित महिलेने जीवन संपवले

| पुणे | प्रतिनिधी |

राज्यभर चर्चेत असलेले वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात आणखी एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपविल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. पती आणि सासरच्या लोकांच्या सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे, तसेच कंपनी सुरू करण्यासाठी 20 लाख रुपये देण्याच्या दबावामुळे नवविवाहित महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दिर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहा झेंडगे मूळगाव कर्देहळी, ता. दक्षिण सोलापूर असे या मृत महिलेचे नाव आहे. पती व कुटुंबियांनी कंपनी सुरू करण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम माहेरहून आणण्यासाठी तिच्यावर वेळोवेळी दबाव आणला. यासाठी केवळ मानसिक नाही तर शारीरिक छळही करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा झेंडगे आणि विशाल झेंडगे यांचा विवाह मे 2024 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवस स्नेहाचे आयुष्य सुरळीत चालले, मात्र लवकरच सासरकडून त्रास सुरू झाला. स्नेहाने यापूर्वी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता, मात्र सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे स्नेहाचा मानसिक तणाव अधिकच वाढला. दरम्यान सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर रक्षाबंधनादिवशीच म्हणजेच शनिवारी (दि.9) घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Exit mobile version