‌‘वंचित’ महाविकास आघाडीत

काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रीवादीचे एकमत

| मुंबई | प्रतिनिधी |

वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा रंगल्या होत्या. गुरूवारच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होतं. वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर उभं केल्याने मविआने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला होता. मात्र, अखेर मंगळवारी (दि.30) वंचितचा मविआत समावेश करत असल्याचं पत्र जारी करण्यात आलं.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता महाविकास आघाडीकडून नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आलं. त्यानुसार, वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचं अधिकृत पत्र द्यावं, अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावं यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. त्यानुसार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्यांनिशी महाविकास आघाडीच्या पत्रावर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.

Exit mobile version