वंजारवाडी फाटा खड्ड्यात

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वंजारवाडी फाट्यावर असलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडले आहेत. कर्जत तालुक्यातील शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते. या ठिकाणी वाहनांची वर्दळ असल्याने खड्डेमय रत्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे खड्डे पडून देखील संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

कर्जत तालुक्यातील पेज नदी पुल सोडल्यानंतर कर्जतच्या दिशेने येताना हे भयानक खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. जवळजवळ आठ फूट लांब आणि एक फूट खोल खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळा असल्याने हे खड्डे पूर्ण पाण्याने भरल्यावर खड्डा किती मोठा आहे, याचा अंदाज वाहन चालकाला येत नाही. यामुळे या रस्त्यावर येणारे वाहन खड्ड्यात आदळून वाहनांचे नुकसान होत आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी रोलरचे मालक महम्मद हरून या व्यक्तीचा अपघात होऊन डोक्याला मार लागल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. चार दिवस कोमात असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तर, त्याच ठिकाणी कशेळे येथील शिक्षिकेचा ही अपघात होऊन हात फॅकचर झाला होता. त्यामुळे जीवघेण्या खड्डे त्वरित भरून पुढे होणारे अपघात टाळता येतील. संबंधित विभागाने या रस्त्याची त्वरित पाहणी करून खड्डेमय झालेले रस्ते भरून डागडुजी करावी आणि वाहन चालकांचा प्रवास सुखकर करावा, आशी मागणी होत आहे.

Exit mobile version