खालापूरमध्ये एकाच दिवशी 38 वनराई बंधारे पूर्ण

। रसायनी । प्रतिनिधी ।

खालापूर पंचायत समितीच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत एकाच दिवशी तब्बल 38 वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. हा उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडला.

या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्रत्यक तालुक्यातील ग्राम पंचायत यांना योग्य मार्गदर्शन करून वनराई बंधाऱ्याचे महत्व विषद केले आहे. त्याच अनुषंगाने गट विकास अधिकारी संदीप कराड यांनी प्रत्यक ग्रामपंचायत यांना निर्देश देऊन प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाज सुरू केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील सखल भाग, जंगल भाग व दुर्गम परिसरात असलेल्या नाले व ओढ्यांवर वनराई बंधारे उभारून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.

ग्रुप ग्रामपंचायत चौक, ग्रुप ग्रामपंचायत लोधीवली, ग्रुप ग्रामपंचायत टेंभरी, ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी, ग्रुप ग्रामपंचायत शिरवली, ग्रुप ग्रामपंचायत साजगाव यांच्यासह तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत यांनी कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या बंधाऱ्यांची बांधणी करण्यात आली.

Exit mobile version