वाफेघर वस्तीची एसटी बंद

विद्यार्थी, छोटे व्यावसायिक व कामगारांची गैरसोय
| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील वाफेघर गावातील वस्तीला असणारी सकाळी पालीला जाणारी एसटी बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, तसेच कामाला जाणारे कामगार, दूधवाले आदी छोटे व्यावसायिक यांची गैरसोय होत आहे. ही वस्तीची एसटी सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी वाहतूक परिवहन महामंडळाकडे अर्ज केला आहे. मात्र, अजूनही कोणतीच दखल घेतली गेलेली नाही.

या बसमुळे आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी व ग्रामस्थांचीदेखील सोय होत होती. मात्र, बस बंद केल्याने त्यांना पदरमोड करत खासगी वाहनाने पालीला यावे लागत आहे. काही विद्यार्थी व ग्रामस्थ तर पायी चालत येतात. त्यामुळे त्यांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. काही लोकांचा रोजगारसुद्धा बुडत आहे. ग्रामस्थांनी एसटी बस सुरू करण्यासाठी पाली परिवहन मंडळाकडे पत्रव्यवहार केला. परंतु, एसटी बस उपलब्ध नसल्याचे कारण तेथून देण्यात आले आहे.

एसटीअभावी विद्यार्थ्यांना लवकर शाळा महाविद्यालयात पोहोचता येत नाही. त्यांचा अभ्यास बुडतो. शिवाय, विद्यार्थी व ग्रामस्थांना अतिरिक्त पैसे देऊन खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पैसे व वेळ वाया जात आहे. त्यामुळे ही बससेवा लवकर सुरू करण्यात यावी.

– राकेश बेलोसे, शिक्षक


यासंदर्भात नक्की काय झाले आहे त्याचा आढावा व माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करतो.

– विकास माने, विभाग नियंत्रक, पेण, राज्य परिवहन महामंडळ
Exit mobile version