प्रशासनाचे दुर्लक्ष :वरंध घाट कागदोपत्री बंद

| महाड | वार्ताहर |

म्हाप्रळ पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट कागदोपत्री बंद असला तरी प्रत्यक्षात मात्र, वाहतूक आजही सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात वरंधा घाट धोकादायकच बनला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी धोकादायक स्थिती असून हा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

म्हाप्रळ पंढरपूर मार्ग हा पुणे जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने गेली अनेक वर्षापासून या मार्गावरून वाहतूक सुरू आहे हा घाट अरुंद असल्याने यापूर्वी अनेक अपघात देखील झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील हा रस्ता आता महामार्ग बांधकाम विभागाच्या माध्यमातून रुंदीकरण होत आहे. या रुंदीकरणासाठी करोडो रुपये मंजूर झाले आहेत, मात्र गेली दोन वर्षापासून महाप्रळ पासून सुरू असलेला हा रस्ता अद्याप महाड पर्यंत पूर्ण झालेला नाही. संत गतीने सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झालेले आहेत. सन 2021 च्या अतिवृष्टी मध्ये माझेरी, पारमाची यादरम्यान घाट जागोजागी खचला होता तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्ता बंद होता. त्यानंतर करोडो रुपयांच्या भिंती उभारून हा मार्ग सुरू करण्यात आला. सद्यस्थितीत वाघजाई पासून ढालकाटीपर्यंत जागोजागी मातीचा भराव संरक्षक भिंती उभी उभी करण्यासाठी केलेले खोदकाम आणि छोट्या-मोठ्या आलेल्या दरडी आजही तशाच असल्याने घाटामध्ये धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे.

जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी एक महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामाकरता हा घाट बंद राहील असा आदेश दिला होता. मात्र, प्रत्यक्षात घाट आजही सुरूच आहे. रस्त्यात टाकलेल्या दगडी मातीचा भराव बाजूला करून वाहन चालक घाटातून मार्ग काढत प्रवास करत आहेत. मे महिन्याच्या काळात आणि पावसाळ्याच्या तोंडावर घाटामध्ये ठीक ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून खोदकाम करून संथ गतीने काम सुरू आहे. घाटात केलेला खोदकामामुळे पावसाळ्याच्या काळात दगडी किंवा मातेचा भराव रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. घाट बंद करण्याचे हेतूने रस्त्यामध्ये मोठ्या दगडी ठेवण्यात आलेल्या आहेत, मात्र या दगडी तात्पुरत्या स्वरूपात बाजूला केल्या गेल्या आहेत. घाटामध्ये पसरणार्‍या धुक्यामधून या दगडी दिसल्या नाहीत तर अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे घाटातून वाहनांना प्रवास करण्यास हा मार्ग बंद करणे आवश्यक आहे.

महामार्ग बांधकाम विभागाचे लक्ष आहे कुठे ?
महाड मधील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांकडून महाड तालुक्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील किल्ले रायगड मार्ग, म्हाप्रळ पंढरपूर रस्ता त्याचप्रमाणे अंबडवे हे तिन्ही रस्ते आजही अर्धवट अवस्थेत संथ गतीने सुरू आहेत. या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य असल्याने पाऊस पडल्यानंतर वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे ठिकठिकाणी रस्ते अर्धवट ठेवण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीने महाप्रळ भोर पंढरपूर या रस्त्यावर धोकादायक स्थिती आहे मात्र महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयातील थंडगार एसी मध्ये बसण्यात धन्यता मानत आहेत. कागदपत्री हा घाट बंद असला तरी प्रत्यक्षात मात्र वाहनांची येजा सुरूच आहे यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
Exit mobile version