। महाड । प्रतिनिधी ।
महाड-पुणे-पंढरपूर मार्गावरील वरंध घाट 1 एप्रिल ते 30 मे या कालावधीमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता; परंतु निवडणूक, लग्नसराई व सुटीचा हंगाम यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता 8 मेपर्यंत हा घाट व मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे ऐन सुट्टीच्या हंगामामध्ये प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
वरंध घाटामध्ये रस्ता दुपदरीकरणाचे व घाटामध्ये संरक्षण भिंती बांधण्याचे काम सुरू असल्याने वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्द येथील वाहतूक बंद करण्याचा जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निर्णय घेतल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आलेली होती. त्यामुळे प्रवाशांना ताम्हिणी घाटमार्गे तसेच आंबेनळी घाटमार्गे प्रवास करावा लागत होता. महाडमार्गे भोर, पुणे, पंढरपूर, फलटण या भागात जाण्यासाठी वरंध घाटातून प्रवास करावा लागतो. महाड-वरंध घाट भोरमार्गे पुणे हा सुमारे 120 किलोमीटरचा रस्ता असून, पुणे येथे जाण्यासाठी हा सर्वांत जुना व जवळचा मार्ग आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता 30 मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता. महाड-दापोली मंडळ रस्ता सोयीचा पडत असेल; परंतु रस्ता बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. सध्या पारमाची वाडीजवळ संरक्षक भिंती व रुंदीकरणाचे काम केले जात आहे. या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहतूक सुरू ठेवून हे काम करणे कठीण असल्याने येथील वाहतूक बंद करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हा प्रशासनाला कळविले होते.