वारे, पोशिर ग्रामपंचायतीची कुर्‍हाड बंदी

कर्जत प्रेस असोसिएशनचे आवाहनानंतर ठराव

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे, त्यामुळे हवामानबदलावर परिणाम दिसून येत आहे. त्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशनकडून कर्जत तालुक्यात जनजागृती चळवळ हाती घेण्यात आली आहे. जंगलतोड होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कुर्‍हाडबंदीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या प्रयत्नाचा भाग म्हणून कर्जत प्रेस असोसिएशन यांच्या आवाहनानंतर तालुक्यातील वारे आणि पोशीर ग्रामपंचायत यांनी असे ठराव घेऊन या चळवळीला आणि जनजागृती मोहिमेला बळ दिले आहे.

कर्जत तालुका निसर्गसंपन्न तालुका म्हणून ओळखला जात आहे. ग्रामीण भागातील वनसंपदा ही तालुक्याची ओळख आहे. मात्र, आता या भागातील जंगल संपत्ती मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. जंगलतोड करणारे ठेकेदार दिवसेंदिवस झाडांची कत्तल करत आहेत. याबाबतीत वन प्रशासनाचे काही बाबतीत दुर्लक्ष होत आहे.झाडे तोडण्याची परवानगी याच विभागाकडून दिली जात आहे. मात्र, या परवानगीच्या अटी- शर्तींचे पालन होत नसल्याने गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी, दिवसागणिक जगल भुईसपाट होत आहे या साठी आता सर्व ग्रामस्थांनी जागरूक होण्याची गरज आहे. वनविभाग नियमाप्रमाणे परवानगी देत असताना काही ठिकाणी अनधिकृतपणे बेसुमार झाडांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत आहे. त्याचा परिणाम निसर्गावर होत असून उन्हाळ्यात प्रचंड तापमान वाढ होत आहे.दिवसागणिक यात वाढ होणार हे निश्‍चित आहे.

यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपचायतीने पुढाकार घेऊन आपल्या वारे ग्रामपंचायत हद्दीत कायम कुन्हाडबंदी करून वनसंपतीचा र्‍हास होऊ नये याकरिता सर्वानुमते ग्रामसभेत ठराव घेऊन सर्व प्रकारच्या खासगी जमिनीवरील वृक्षतोड किमान कायम कुन्हाडबंदी करावी, असा ठराव ग्रामसभेत प्रस्तावित करून तो शासनाच्या संबंधित विभागास पाठवावे जेणेकरून तापमानवाढीच्या समस्या काही प्रमाणात कमी होईल यासाठी कर्जत प्रेस असोसिएशनकडून जनजागृती केली जात आहे. यावर्षी तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त गेला आहे, अशीच स्थिती राहिली तर पुढच्या पिढीच दूर राहिलं आजच्या पिढीलाही बाहेर फिरणे मुश्कील होईल. एक दिवस असा येईल की प्रचंड वाढलेल्या तापमानाने रस्स्यावर माणसं करपून जळतील.यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी असे ठराव आपल्या ग्रामसभेत घ्यावेत, असे आवाहन कर्जत प्रेस असोसिएशनने केले आहे.

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मध्ये पत्रकार दीपक बोराडे यांनी जंगलाचे महत्त्व विशद करून ग्रामसभेत ठराव मांडला, त्या ठरावाला शरद तवले यांनी अनुमोदन दिले. त्या ठरावाला सर्वांनी सहमती दर्शवून ठराव मंजूर केला आहे. तर पोशीर ग्रामपंचायतीकडूनदेखील असा ठरव ग्रामस्थांनी ग्रामसभेत आणला. सरपंच आरती राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत पांडुरंग राणे यांनी ठराव मांडला आणि ग्रामपंचायत सदस्य अनिल जोशी यांनी अनुमोदन देत ठराव मंजूर केला आहे. तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीकडून पुढील 15 वर्षे कुर्‍हाड बंदी ठराव घेण्यावर कर्जत प्रेस असोसिएशनकडून प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version