दिशा महिला मंचामार्फत महिलांसाठी विविध उपक्रम

। पनवेल । वार्ताहर ।

दिशा महिला मंचामार्फत नालंदा बुद्धविहार, कामोठे येथे आरोग्य शिबिर, बचत गटासंदर्भात मार्गदर्शन,व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व्यवसायाचे प्रेझेंटेशन व मनोरंजनासाठी पैठणीच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र, कामोठे पनवेल महानगरपालिकेकडून आयुष्यमान भव मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेंतर्गत स्वच्छता अभियान, आयुष्यमान भारत कार्डविषयी जनजागृती व महिलांचे कार्डही काढण्यात आले. महिलांच्या विविध रक्त तपासण्यादेखील करण्यात आल्या. यावेळी संजय शिर्के हेल्थ ॲडव्हायजर यांनी डेंग्यू व मलेरिया होण्यापासून कशी खबरदारी घ्यावी यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच डॉ. सुवर्णा चोपडे व डॉ. श्वेता भालेराव यांनी विनस वूमन्स हॉस्पिटलमार्फत तपासणी केली. यावेळी महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, लठ्ठपणा व संतुलित आहार आणि कॅन्सरविषयीचे निदान व मार्गदर्शन केले. तसेच दातांची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात डॉ. स्वाती वारे यांनी मार्गदर्शन केले. आरती चव्हाण व त्यांच्या टीमने महिलांना कागेन वॉटरसंदर्भात माहिती दिली. पनवेल महानगरपालिका आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी रविवारी होणाऱ्या स्वच्छता रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महिलांना केले. यावेळी व्यवसाय करणाऱ्या महिलांनी आपण करत असलेल्या व्यवसायाची माहिती देत यशस्वीरित्या तीन वर्षे पूर्ण झालेल्या बचत गटांना मार्गदर्शन केले. आरोग्याबरोबरच मनोरंजन व्हावं यासाठी मोरया कलेक्शन यांच्यामार्फत आरती नवघरे यांनी पैठणीचा खेळ घेऊन विजेत्या स्पर्धेक सुवर्णा डुबल यांना मानाची पैठणी, तर नीलिमा सहाणे यांना सोन्याची नथ देऊन अभिनंदन केले.

Exit mobile version