पनवेल पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल

। पनवेल । वार्ताहर ।
स्कुटी वरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगईने व निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील डिव्हायडर ला धडकून झालेल्या अपघातात तो स्वतः जखमी झाल्याची घटना पळस्पे फाटा राहुल पार्क हॉटेल समोर घडली आहे. सुयोग कांबळे हा जेएनपीटी कडून पुणे दिशेने जात असताना पळस्पे फाटा राहुल पार्क हॉटेलसमोर स्कुटी क्रमांक एम एच 46 ए वाय 5382 ही डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात तो स्वतः जखमी झाला.

मोटारसायकलस्वारांनी वीस हजारांची रोकड चोरली
रोख रकमेचे बंडल पिशवीत घेऊन पायी चाललेल्या एका इसमाच्या हातातील पिशवी मोटर सायकल वरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी खेचून ते पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. मनिष म्हात्रे वय 42 हे त्यांच्या ताब्यात असलेले वीस हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन ते रस्त्याने पायी जात असताना युनिकॉर्न मोटरसायकल वरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी खेचून ते पसार झाले. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बसमधील बॅटरीची चोरी
पनवेल रेल्वे स्टेशन जवळील एनएमएमटी चौकीजवळ उभी करून ठेवलेल्या एका बसमधील बॅटरीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. बस चालक बाळकृष्ण सुतार यांनी बस ही पनवेल रेल्वे स्टेशन जवळील चौकीजवळ उभी केली होती.त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या बस मध्ये असलेली 14 हजार 600 रुपये किमतीची बारा वॅट ची बॅटरी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

गाडीच्या धडकेने दोघेजण जखमी
पनवेल जवळील गार्डन हॉटेल सिग्नल जवळ एका भरधाव गाडीने मोटार सायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटासायकलवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. संतोष माने हे त्यांच्या ताब्यातील गाडी घेऊन भरधाव वेगाने जात असताना त्यांनी हॉटेल गार्डन जवळील सिग्नल जवळ एका मोटार सायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात हृत्विक कोडथे व त्याचा मित्र रोशन हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version