लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रायगड जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हाधिकारी माननीय निधी चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभावी माध्यमाचा उपयोग करून 27 जुन ते 10 जुलै व 11 जुलै ते 24 जुलै 2021 या दोन टप्प्यात जागतिक लोकसंख्या दिन 2021 साजरा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी दिली.

लोकसंख्या दिन फक्त एक दिवस साजरा न करता दोन टप्प्यात साजरा करावयाचा आहे. पहिल्या टप्पात दांपत्य संपर्क पंधरवडा 27 जून ते 10 जुलै 2021 या कालावधीमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्याकरीता समाजात जनजागृती व संवेदीकरण करावयाचे आहे तसेच दुसर्‍या टप्पात लोकसंख्या स्थिरता पंधरवडा 11 जुलै ते 24 जुलै 2021 या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कुटुंब नियोजनाची सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या दोन्ही टप्प्यातील कार्यक्रम राबविताना कोविड हा आजार टाळण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनाचे घोषवाक्य संकट काळातही करूया कुटुंब नियोजनाची तयारी ,सक्षम देश व कुटुंबाची ही आहे संपूर्ण जबाबदारी असे आहे.

जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.यामध्ये 27 जून ते 24 जुलै 2021 पर्यंत दोन टप्प्यात गाव पातळीवर जागतिक लोकसंख्या दिन अतिशय प्रभावीपणे राबविला जाणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.

Exit mobile version