| अलिबाग | प्रतिनिधी |
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेएसएम महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या विविध कार्यक्रमांसाठी जेएसएमच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, सचिव गौरव पाटील, संचालिका शारदा धुळप, कायदेशीर सल्लागार ॲड. सचिन जोशी यांच्यासह ॲड. महेश पटेल, आर्य पाटील, डॉ. सोनाली पाटील, डॉ. नीलम हजारे, डॉ. सिमंतिनी ठाकूर, डॉ. प्रविण गायकवाड, अजय सावंत, भारती पाटील, संतोष मढवी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम सकाळी रामशेठ ठाकूर ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य रंगमंचावर रक्तदान शिबिराचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, एच.डी.एफ.सी बँक अलिबाग आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र क्रिकेट नेट्स व पॅविलियन याचे उद्घाटन देखील ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान, कै. जयवंत केळुसकर सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार जेएसएम महाविद्यालयातील विविध ज्ञानशाखांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख बक्षीस आणि पदक देऊन सत्कार करण्यात आला. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. गौतमभाई पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण असणारा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कै. जयवंत केळूसकर सभागृहात पार पडला. यावेळी ॲड. गौतम पाटील यांच्या कुटुंबींयांसह माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक ॲड. मानसी म्हात्रे, प्रदिप नाईक, अनिल चोपडा, संजना किर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत आदि मान्यवरांसह मित्र परिवार, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, जनता शिक्षण मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शैक्षणिक कार्यातील त्यांचे योगदान अधोरेखित केले. तसेच, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले.
ॲड. गौतम पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
