उलवेमधील विविध प्रश्न मार्गी लागणार

प्रितम म्हात्रेंनी घेतली सह-व्यवस्थापकीय संचालकांची भेट

| पनवेल | वार्ताहर |

सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे परंतु अजूनही येथे सेवा आणि सुविधा या पूर्णपणे नागरिकांसाठी उपलब्ध नाहीत. त्यांपैकी काही ठराविक विषयात लक्ष देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून शेकाप नेते प्रितम जनार्दन म्हात्रे विविध सिडकोच्या विभागांमध्ये पाठपुरावा करत होते. या विषयांना मार्गी लावण्यासाठी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या दालनात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि उलवे मधील विविध संघटनांचे सभासद यांची बैठक पार पडली.

त्यात मुख्यत्वे करून फेरीवाले आणि अपंग यांच्यासाठी जे आरक्षित भूखंड आहेत ते विकसित करणे आणि मार्केटसाठी जागा उपलब्ध करून देणे. जेणेकरून स्थानिकांना त्याचा लाभ होईल जेणेकरून अतिक्रमण विरोधी कारवाईच्या वेळी जो त्रास स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांना होत होता तो विषय भविष्यात कायम निकाल निघेल. शीख बांधवांसाठी एकही गुरुद्वारा नसल्याने त्याकरिता सिडकोच्या नियमानुसार सेक्टर 23 येथे गुरुद्वारा साठी प्लॉट उपलब्ध करून देण्यासाठी शिख बांधवांचे प्रतिनिधी यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

नव्याने निर्माण होत असलेल्या वस्तीमध्ये तरुण पिढीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्याचा प्रसार होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यानुसार लवकरच या विषयात सकारात्मक पावले सिडकोच्या माध्यमातून आम्ही उचलू असे गणेश देशमुख यांनी सांगितले. नागरिकांना आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये अपुऱ्या सुविधा आहेत. नागरिकांच्या आरोग्य सेवेकरिता सेक्टर 8 येथे आरोग्य सेवेसाठी आरक्षित भूखंड क्रमांक 40 आहे त्या ठिकाणी आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात यावे जेणेकरून परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतील अशी मागणी त्यांनी केली.

उलवे शहरात आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, नागरिकसेवा सुविधा असे विविध विषय प्रलंबित आहेत. त्यांचा पाठपुरावा आम्ही घेत आहोत. यात मुख्यत्वे करून स्थानिक फेरीवाले आणि छोटे व्यापारी जे आहेत यांच्यासाठी सिडकोचे आरक्षित असलेले भूखंड त्वरित त्यांना उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सर्व मुख्य विषयांवर सिडकोच्या माध्यमातून लवकरच योग्य ते निर्देश देऊन नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.

प्रितम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेता पनवेल
Exit mobile version