एकादशीसाठी वारकरी पंढरपूरला रवाना

| महाड । वार्ताहर ।

जिल्ह्यातील सुमारे पाच हजार वारकरी येणार्‍या कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठ्ठल-रखुमाई नामाचा जयजयकार करत अनेक वारकरी पायी निघाले आहेत. यात महाड तालुक्यातील गांधारपाले येथील 91 वर्षांची अखंड परंपरा असलेली पायीवारीही पंढरपूरकडे रवाना झाली आहे. विठू माऊली आणि वारकर्‍यांचे नाते अतूट असते. म्हणूनच पंढरपूरला जाण्यासाठी विठूभक्त आसुसलेले असतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन दिवशी पंढरपूरला वारकर्‍यांची लाखोंची हजेरी असते.

कोकणामध्ये शेतीची कामे असल्याने आषाढी एकादशीला वारकर्‍यांना जाणे शक्य होत नाही. त्यामुळे कोकणातून कार्तिकी एकादशीला पंढरीला जाणार्‍यांची गर्दी मोठी असते. या वर्षी 4 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी असून जिल्ह्यातून सुमारे पाच हजार वारकरी पंढरपूरला रवाना होत आहेत. कोरोनाकाळात वारीवर मर्यादा आल्याने अनेकांना या काळात विठू दर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे आता कार्तिकी एकादशीला जाणार्‍यांची गर्दी वाढली आहे. पायी वारी करणारे वारकरी यापूर्वीच आपल्या घरातून निघाले आहेत. टाळमृदंग व माऊलीच्या जयघोषात त्यांची ही वारी सुरू झाली आहे. महाड तालुक्यातील विन्हेरे, आंबवडे, शिरवली, जिल्ह्यातील कोलाड, इंदापूर, तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, गांधारपाले, वहूर, वरंध, पोलादपूर या भागातून सुमारे पाच हजार वारकरी पंढरपूरला जात आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेतलेल्या महिलावर्ग दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत.

रोहा तालुक्यात पायी दिंडी वारीचे आयोजन

| खांब-रोहा । वार्ताहर ।

गेली 22 वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी रोहा तालुक्यातील संभे ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन शनिवार दि.12 ते गुरूवार दि.24 या कालावधीत करण्यात आली आहे. सदर दिंडीचे प्रस्थान कार्तिकी कृ.चतुर्थी दि.12 भैरीनाथ मंदिर संभे येथून स.8:30 वा. होणार असून यावेळी श्री.भैरीनाथ अभिषेक, पालखी पूजन, विणा पूजन, ध्वज पूजन, कळश पूजन, तुळस पूजन, पादुका पूजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या प्रसंगी खा.सुनील तटकरे, राजेश सानप, सुरेश महाबळे, प्रितम पाटील, सुनील सानप, अ‍ॅड.जनार्दन घायले, शिवराम महाबळे, विष्णू लोखंडे, संजय राजिवले, महेश ठाकूर, राकेश शिंदे, हा.पो.नि.कोलाड अजित साबळे, संजय सानप, समीर महाबळे, अ‍ॅड.महेश घातले, समिर सानप, योगेश सानप, दिनेश सानप, मंगेश सानप, देविदास सानप आदी. उपस्थित राहणार आहे.

Exit mobile version