इंद्रायणीत उतरलेला वारकरी गेला वाहून

एनडीआरएफच्या जवानांच्या तप्तरतेमुळे वाचला जीव

। आळंदी । प्रतिनिधी ।

आषाढी वारीच्या निमित्ताने आळंदीत बहुसंख्येने वारकरी गोळा झाले आहेत. त्‍यापैकी एक वारकरी इंद्रायणी नदीत वाहून जात असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. लगेचच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने तातडीने बचावकार्य करत त्‍याला सुरक्षित बाहेर काढले आहे. अमोल तुकाराम राठोड (४०) रा. यवतमाळ असे या वारकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त यवतमाळ येथून आलेले अमोल राठोड हे गुरुवारी (दि.१९) इंद्रायणी नदीत स्नानासाठी उतरले होते. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्‍यामुळे राठोड यांना पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा प्रवाहाचा वेग जास्त असल्याने त्‍यांचा तोल गेला आणि ते नदीच्या जोरदार प्रवाहात वाहू लागले. राठोड यांना पाण्यात वाहत जाताना पाहून आसपासच्या भाविकांनी आणि नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तात्काळ या घटनेची माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला देण्यात आली. तातडीने एनडीआरएफचे प्रशिक्षित जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच बचाव मोहीम सुरू केली. एनडीआरएफच्या जवानांनी मोठ्या कौशल्याने आणि धैर्याने अमोल राठोड यांना नदीच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढले. राठोड यांना सुखरूप पाहून उपस्थित भाविकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. वारीच्या काळात इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व वारकऱ्यांनी आणि भाविकांनी नदीत स्नानासाठी उतरताना विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version