उद्यापासून वरसोलीची यात्रा

खाद्यपदार्थांसह वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने सजणार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

साजगावच्या यात्रेनंतर आता वरसोली येथील यात्रेचे वेध लागले आहेत. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल-रखुमाई देवस्थानच्या यात्रेला मंगळवारी (दि.26) सुरुवात होणार आहे. रविवारपर्यंत पाच दिवस ही यात्रा सुरु राहणार असून, या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावणार आहेत. या पाच दिवसांत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा समितीसह पोलिसांमार्फत बैठक घेण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील नियोजन करण्यात आले आहे.

कार्तिकी एकादशीपासून यात्रेचा हंगाम सुरु होणार आहे. अलिबाग शहरालगत असलेल्या वरसोली यात्रेची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मंगलमय व धार्मिक वातावरणात ही यात्रा संपन्न होते. यावर्षी मंगळवारपासून रविवारपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत वरसोली यात्रा आहे. या यात्रेत भाविकांची पाच दिवस अलोट गर्दी होते. त्यानुसार भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, त्यांना आवश्यक त्या प्राथमिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विठ्ठल-रखुमाई मंदिर देवस्थान व यात्रा कमिटीने मेहनत घेतली आहे. मध्यरात्री काकड आरती होणार आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. सकाळपासून दिवसभर भजन, कीर्तन आदी धार्मिक उपक्रम घेण्यात येणार आहेत.

यात्रेनिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य पद्धतीने रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरासह काही अंतरावर खाद्यपदार्थांपासून वेगवेगळ्या वस्तू, पूजेचे साहित्य, खेळणी अशा वेगवेगळ्या प्रकारची लहान-मोठी दुकाने थाटली जाणार आहे. आकाश पाळणा व इतर खेळाची दुकानेही यात्रेमध्ये असणार आहेत. दुकानदारांसाठी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पोलीस मदत केंद्र उभारणार
यात्रेमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलिबाग पोलिसांमार्फत योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी गर्दीत पोलिसांची साध्या वेशात गस्त राहणार आहे. यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कमिटीची बैठक घेण्यात आली असून, त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. यात्रेमध्ये मदतीसाठी मदत केंद्र उभारण्यात आला आहे. सर्वांनी मंगलमय व आनंदमय वातावरणात हा सोहळा साजरा करा, असे आवाहनही अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले आहे.
Exit mobile version