वासांबे मोहोपाडा भारताता अव्वल; आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार जाहीर
| रसायनी | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयामार्फत सन 2024-25 या वर्षांसाठी देण्यात येणारा आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार या गटात रायगड जिल्ह्यातील वासांबे ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्कारामुळे रायगड जिल्ह्याचा लौकीक राष्ट्रीय स्तरावर पुन्हा अधोरेखित झाला आहे.
देशभरातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या स्पर्धेत वासांबे ग्रामपंचायतीने बाजी मारत रायगड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक यश मिळवले आहे. हा पुरस्कार केवळ ग्रामपंचायतीचा सन्मान नसून गावपातळीवरील पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल मानली जात आहे. वासांबे विकासासाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या गाव विविध योजनांमध्ये ग्रामस्थांचा थेट सहभाग, पर्यावरणपूरक उपक्रम, मूलभूत सुविधांचा विकास, आर्थिक स्वावलंबन आणि प्रशासनातील पारदर्शकता यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली. गावाच्या विकासात लोकसहभाग आणि जबाबदारी यांना प्राधान्य देत वासांबे ग्रामपंचायतीने आत्मनिर्भर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. आज राज्यातील अनेक ग्रामपंचायती अजूनही रस्ते, पाणी, गटारे, कचरा व्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराच्या समस्यांमध्ये अडकलेल्या वासांबे ग्रामपंचायतीने इच्छाशक्ती आणि प्रामाणिक कामाच्या बळावर गाव बदलू शकते, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता वासांबे ग्रामपंचायतीचा आदर्श इतर ग्रामपंचायतींसमोर उभा राहिला असून, गावपातळीवरील विकासाच्या कामांबाबत नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार गटात देशात प्रथम क्रमांक पटकावत वासांबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्राची शान अधिक उंचावली आहे.
या पुरस्काराबद्दल रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसल, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी वासांबे ग्रामपंचायत प्रशासन, खालापूरचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत पुरस्कार मिळविते ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. आपल्या गावाचा विकास साधणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. रायगड जिल्हा परिषदेचे सहकार्य कायमच यासाठी असणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले.
वासांबे ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. स्वतःचे महसुलाचे स्त्रोत वाढवणे, या महसुलाचा वापर करून गावामध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अशाप्रकारची कामे करून गावाचा विकास साधावा.
नेहा भोसले,
मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप
