वसंत मोरेंचा वंचितला ‘जय महाराष्ट्र’

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यातले मनसेचे माजी नेते वसंत मोरे येत्या 9 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्याबद्दल गुरूवारी मोरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी आगामी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. पुण्यातील दोन मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकला आहे. मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणूक वंचितकडून लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. आता पुढील राजकीय वाटचाल मोरे हे ठाकरे गटातून पार पाडणार आहेत. वसंत मोरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी मला दोन पर्याय आहेत. आगामी निवडणूक खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून लढू शकतो. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता तरीही मला चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना दाखल झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहणार आहे. उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर वसंत मोरेंना हडपसर किंवा खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मिळू शकते. वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, तरी त्यांचा पराभव झाला होता. आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांची स्वतःच्या जीवावर निवडून येणारे नेते अशी ओळख आहे. त्यांनी राज ठाकरेंचे आदेश कधीच मोडले नाहीत. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोना काळात वसंत मोरे यांच्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले होते. जनतेची केलेली सेवा ते व्हिडीओमार्फत सोशल मीडियावर टाकतात. त्यामुळेच त्यांना राज्यभरात ओळख मिळाली आहे.

Exit mobile version