स्वदेश फाऊंडेशनच्या पुढाकारातून सोहळा संपन्न
| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील वाशी हवेली कोळीवाडा गावाला स्वदेस फाऊंडेशन च्या वतीने स्वप्नातील गाव प्रमाणित करण्याचा कार्यक्रम सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करून करण्यात आली. गाव विकास समितीने आपले स्वप्नातील गाव वाटचाल सुरू झाल्यापासूनचे अनुभव सांगितले. सुरवातीला गावाची ओळख अस्वच्छ, दुर्गंधी, घाणेरडे गाव म्हणून ओळखले जात होते, पण स्वदेसच्या मार्गदर्शनामुळे गावातील लोकांनी स्वच्छतेवर भर दिला. आज या गावाची ओळख आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये स्वप्नातील गाव म्हणून झाली आहे. फक्त तालुक्यातीलच नाही तर, आजूबाजूच्या तालुक्यातीलसुद्धा लोकं गावाला भेट द्यायला येत आहेत.
आरोग्य, स्वच्छता व उपजीविका याविषयी अनेक उपक्रम स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने गावांमध्ये राबवण्यात आले आहेत, शासनाच्या योजनेमधील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना व कॅम्प गावांमध्ये राबवण्यात आलेले आहेत. विशेष करून 100 टक्के कुटुंबांना मासेमारी जाळे वाटप स्वदेस फाऊंडेशनकडून झाले आहे. त्यामुळे गाव आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. महिलांचे नेतृत्व, युवा सरपंच, गावातील एकोपा या वैशिष्ट्यांमुळे स्वदेस व शासन यांच्या समन्वयाने स्वप्नातील गाव निर्माण झाले आहे. मान्यवरांच्या मनोगतात त्यांनी प्रामुख्याने कौतुकास्पद उल्लेख केला की, सीसीटीव्ही कॅमेरे, थुंकण्यासाठी बेसिन, पिण्याच्या पाण्याचा सायरन, सिलिंडर व्यवस्था, स्वच्छता यासारख्या सोयीसुविधा तालुक्याच्या ठिकाणी नाही त्या आज कोळीवाड्यासारख्या एकेकाळी मागास असलेल्या गावात शाश्वत आहेत.
स्वदेस फाऊंडेशनचे संचालक प्रसाद पाटील आणि प्रदीप साठे यांनी स्वदेस हा एक विचार आहे आणि तो रुजविण्याचे काम या गाव विकास समितीने उत्तमरित्या केले आहे, असे मत मांडले. शेवटी आभार व्यक्त करताना गाव विकास समिती सदस्य व सरपंच मा. जगन्नाथ तांडेल यांनी आमच्या गावासारखेच संपूर्ण ग्रामपंचायत जिल्हा स्तरावर आदर्श करण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी वाशी हवेली सरपंच जगन्नाथ तांडेल,स्वदेस फाऊंडेशनचे संचालक प्रसाद पाटील, प्रदीप साठे, राकेश मोरे तळा तालुका व्यवस्थापक, स्वदेस समन्वयक सागर पाटील, स्वदेस टीम, ग्रीन फाऊंडेशनचे प्रमुख केदार सोहनी, पो.नि. गणेश कराड तसेच वाशी हवेली कोळीवाडा महिला मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते.