नागाव पंचायतीचा आगळा वेगळा उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
वाढत्या प्रदुषण व तापमानावर मात करण्यासाठी वड वृक्षारोपणातून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. नागाव ग्रामपंचायतीमार्फत हा आगळा वेगळा उपक्रम सरपंच हर्षदा मयेकर यांच्या संकल्पनेतून गुरुवारी (दि.20) राबवण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वणवा व अनेक कारणांमुळे झाडे नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका वाढला आहे. उष्णता वाढत आहे. मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वटपोर्णिमेचे औचित्य साधत नागाव ग्रामपंचायतमार्फत वड वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवारी नागाव परिसरात राबवण्यात आला. नागाव पाल्हे या परिसरात 30 हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. त्या रोपांचे संगोपन करण्याचाही संकल्प करण्यात आला . यावेळी पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .






