व्हीसीए टी-20 आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा

अकोल्याची यवतमाळवर, तर वाशिमची गोंदियावर मात

| अकोला | वृत्तसंस्था |

जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला व अकोला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्हीसीए टी-20 आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि.2) पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये अकोला संघाने यवतमाळ संघाला, तर वाशिम संघाने गोंदिया संघाला पराभूत केले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळविल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यवतमाळ संधाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अकोला संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकांमध्ये आठ गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात यवतमाळ संघाला 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून केवळ 159 धावाच करता आल्या. त्यामुळे संघाला 32 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात 79 धावा करणारा अकोल्याचा कर्णधार वैभव लांडे हा सामानावीर ठरला.

पंच म्हणून आशिष सोळंके व संजय बुंदेले, तर स्कोअरर म्हणून निलेश लखाडे यांनी काम पाहिले. उमरी येथील स्व. अरुण दिवेकर क्रिंडागणावर खेळविलेल्या गेल्या दुसर्‍या सामन्यात वाशिम संघाने नाणेफेकचा कौल जिंकत गोंदिया संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. गोंदिया संघाने निर्धारित षटकांमध्ये 8 गडी गमावत 146 धावा उभारल्या. वाशिम संघाने 18.4 षटकांमध्ये केवळ चार गड्यांच्या मोबदल्यात 147 धावांचे विजयी लक्ष्य गाठत सामना खिशात घातला. 3 बळी व 52 धावा अशी अष्टपैलु कामगिरी करणारा वाशिमचा अध्ययन डागा हा सामनावीर ठरला. पंच म्हणून अनील एदलाबादकर व संदीप कपूर, तर स्कोअरर म्हणून सावरमल शर्मा यांनी काम पाहिले.

विदर्भातील प्रतिष्ठेची मानल्या जाणार्‍या स्पर्धेचे उद्घाटन येथील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा समिती चेअरमन शरद पाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हीसीए निवड समिती सदस्य नईम रज्जाक व चंद्रशेखर अत्राम, पंच समितीचे मंगेश खेळकर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अशोक ढेरे, अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार जावेद अली व विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर मंचावर उपस्थित होते. यावेळी अकोला क्रिकेट क्लबचा इराणी व रणजी ट्रॉफी खेळाडू आदित्य ठाकरे याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ खेळाडू परिमल कांबळे, सुमेध डोंगरे, बंटी क्षीरसागर, किशोर धाबेकर, अभिजीत करणे, शेखर बुंदेले उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन अविनाश देशमुख यांनी केले.

Exit mobile version