। अलिबाग । प्रतिनिधी ।
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय युथ फेस्टीवलमध्ये अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील वेदांत विजय पाटील याने भरारी घेतली. त्याने या फेस्टीवलमध्ये रायगडसह राज्याचे प्रतिनिधीत्व केले. त्याच्या या चांगल्या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
वेदांत विजय पाटील हा तरुण अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील रहिवासी आहे. अॅड. विजय पाटील यांचा तो सुपूत्र आहे. सध्या तो इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांसह त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विकसित भारत अंतर्गत यंग लिडर डायलॉग हा उपक्रम सुरु करण्यात आला. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरिय पीपीटी चॅलेजमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याची दिल्ली येथे होणार्या नॅशनल युथ फेस्टीवलमध्ये निवड झाली. 10 ते 12 जानेवारी या कालावधीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विकसीत भारत चॅलेंज राष्ट्रीय युथ फेस्टीवल पार पडला. या फेस्टीवलमध्ये त्याने प्रतिनिधीत्व केले. या फेस्टीवलमध्ये रायगड जिल्ह्यातून फक्त त्याचीच निवड झाली. त्याने आपल्या कर्तृत्व व वकृत्वाच्या जोरावर चांगली कामगिरी बजावून राज्यासह रायगड जिल्हा, अलिबाग तालुका आणि कुरुळ गावाचे नाव लौकीक केले.