चित्रलेखा पाटील, अॅड. मानसी म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘शाळेत बुद्धिबळ’ उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेने रविवारी (दि.12) अलिबागमधील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, गोरेगाव, मुरुड, रत्नागिरी व पुणे येथून 29 प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पीएनपी शैक्षणिक संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील आणि अलिबाग नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांच्या उपस्थित पार पडले.
यावेळी विलास म्हात्रे यांनी ‘शाळेत बुद्धिबळ’च्या संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. तर, प्रशिक्षक सुमुख गायकावड यांनी या प्रशिक्षण शिबिराचे प्रयोजन कशासाठी करण्यात आले याबाबत सांगितले. अॅड. मानसी म्हात्रे यांनी बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचे आश्वासन दिले असून या प्रशिक्षण शिबिराचे कौतुक केले आहे. तसेच, चित्रलेखा पाटील यांनी देखील या स्तुत उपक्रमाचे खूप कौतुक केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी शैक्षणिक संस्थेत हा उपक्रम राबविला जाईल. तसेच, अलिबाग, मुरुडसह संपुर्ण रायगडमधे युवी स्पोर्ट्सकडून स्पर्धा घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे.
संध्याकाळी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सर्वांची 1 तासाची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात, 65 ते 80 मार्क मिळवलेल्या प्रशिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून 80च्या वर मार्क मिळविणार्याला वरिष्ट प्रशिक्षक ही पदवी देण्यात येणार आहे.