| नवी मुंबई | प्रतिनिधी |
शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर नैतिकता जपत समाजकारण केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच मी माझी आगामी वाटचाल करणार आहे. सामान्य जनतेच्या विश्वासाला कधीही तडा लागू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नेरुळ येथे बोलताना केले. राज्यात शेकाप वाढविण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागू, अशी ग्वाही यावेळी डॉ. देशमुख यांनी बोलताना दिली.
सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळाच्यावतीने सांगोल्याचे शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा विजयी मेळावा नेरुळ येथील पुणे विद्यार्थी भवन संकुलात मंडळाचे प्रमुख सल्लागार रंगनाथ चोरमुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळाचे अध्यक्ष शामराव आलदर, उद्योजक देवाप्पा लवटे, विजय आलदर, पांडुरंग बंडगर, अंकुश आलदर, सोमनाथ माने, बापू सरगर, विशाल बंडगर, संगीता व्हनमाने, डॉ. शंकर चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळाच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यास उत्तर देताना आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पुढे सांगितले की, सांगोलामधील वाढती गुंडगिरी मोडीत काढायची आहे तसेच सांगोला सिंचन योजना कार्यान्वित करणे, सांगोला एमआयडीसी निर्माण करणे आदी कामांना प्राधान्य देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हा विजयी मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे विद्यार्थी गृहाचे कुलसचिव दिनेश मिसाळ, मंडळाचे उपाध्यक्ष दत्तात्रय सरगर, उद्योजक देवाप्पा लवटे, सचिव सचिन व्हनमाने, अरविंद माने आदींनी सहकार्य केले.