उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
I मुंबई I प्रतिनिधी I
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून परदेशी गुंतवणुकीचे प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका महाविकास आघाडीमधील नेते आमच्या सरकारवर करून जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे येत्या 30 दिवसांत वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस आणि सेफ्रोन या प्रकल्पाबाबत जनतेला वस्तुस्थिती समजावी याकरिता एक श्वेतपत्रिका जाहीर करणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
या श्वेतपत्रिकेमुळे दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल, असा इशारा सामंत यांनी दिला आहे. शिवसेनेचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रात येणार्या गुंतवणूकदार कंपन्या गुजरातमध्ये गेल्या याला आमचे सरकार जबाबदार असल्याची हाकाटी पिटत आहेत. ही एक प्रकारे राज्याची बदनामी असून, जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोप उदय सामंत यांनी केला.
कोकणातील तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नाणार रिफायनरीला कोण विरोध करत होते, आज त्या कंपनीने 3 लाख कोटी वरून 2 लाख कोटी रुपये गुंतवणूक कमी केली आहे. राज्याचे एक प्रकारे आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो तरुणांना मिळणारी रोजगाराची संधी हुकली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात उद्योगधंदे वाढीसाठी काही करू न शकलेले नेतेमंडळी आता आमच्यावर अपयशचे खापर फोडत आहेत, अशी टीका यावेळी उदय सामंत यांनी केली.