पौष्टिक भाज्यांचा शालेय आहारात समावेश
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील परसबाग बहरल्या आहेत. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण अंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुधागड तालुक्यातील सर्वच शाळांनी आपला सहभाग नोंदवला. पाच्छापूर, सागवाडी व तिवरे जिल्हा परिषद शाळांनी सुयश मिळवले असून या शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेचे परीक्षण तालुकास्तरावरून करण्यात आले. यामध्ये राजिप पाच्छापूर शाळेचा प्रथम क्रमांक, राजिप सागवाडी शाळेचा द्वितीय क्रमांक व राजिप तिवरे शाळेचा तृतीय क्रमांक पटकवला. तसेच सिद्धेश्वर, रासळ आदीवासीवाडी व भेलीवसावे या जिल्हा परिषद शाळांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.
तालुक्याच्या गट विकास अधिकारी लता मोहिते, गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, विस्तार अधिकारी व पोषण अधीक्षक नवनाथ साबळे यांनी सर्व विजेत्या शाळांना शुभेच्छा दिल्या. तसेच पेडली व नाडसूर केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल राणे यांनी शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल कौतुक केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळांच्या परिसरात असलेल्या या परसबागांमध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या यांची लागवड केलेली आहे. ज्यामध्ये भेंडी गवार, वांगी, पालक, दुधी, शिराळे व कारले यासह टोमॅटो आणि इतर भाज्या व फळ व फुलझाडांचा समावेश आहे. या सर्व परसबागांची येथील शिक्षक व विद्यार्थी अतिशय उत्तम प्रकारे निगा राखतात.
परसबागेची वैशिष्ट्ये
या परसबागा शाळेजवळ व शाळेच्या परिसरात आहेत. त्यामुळे भाजीपाला व झाडांना पाणी देणे, निगा राखणे, तण काढणे सहज सोपे होते. या परसबागांची रचना अशी आहे की कमी जागेत जास्तीत जास्त भाज्या, फुले किंवा औषधी वनस्पती लावता येतात. परसबागेमुळे शाळेला रोजच्या पोषण आहारासाठी ताजी, रसायनमुक्त आणि पौष्टिक भाजी मिळते. रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर जास्त असतो, त्यामुळे खर्च कमी व पर्यावरण हितकारी. परसबाग ही शाळेसाठी एक उपयुक्त व आनंददायी शिकण्याचे केंद्र आहे.
शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी परसबाग फुलवण्यासाठी मेहनत घेतात. याद्वारे स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळतो. परसबाग फुलवण्यासाठी वापरलेल्या सेंद्रिय खतामुळे या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. शिवाय मुलांमध्ये शेतीविषयक आवड निर्माण होते. स्वकष्टातून उभारणी केल्यामुळे अन्नाची किंमत कळते.
– अनिल राणे, केंद्रप्रमुख, पेडली व नाडसूर केंद्र
