माझी शाळा, माझी परसबाग अंतर्गत उपक्रम
| नेरळ | प्रतिनिधी |
हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे जन्मगाव असलेल्या गावातील शाळेच्या छतावर भाजीपाल्याची बाग फुलली आहे. विद्यार्थ्यांनी श्रमदान करून भाजीपाला लावण्यासाठी कुंड्या आणल्या आणि मातीपासून भाजीपाल्याची रोपे तयार केली. साधारण जुलै महिन्यात हाती घेतलेला हा उपक्रम यशस्वी झाला असून, माझी शाळा, माझी परसबाग अंतर्गत यशस्वी ठरलेला हा उपक्रम कुतूहलाचे विषय बनले आहे.
मानिवली येथील इयत्ता पहिली पासून आठवी पर्यंत शिक्षण दिल्या जाणाऱ्या शाळेला उपक्रमशाही शाळा म्हणून ओळखले जात आहे. शाळेकडून राबविला जाणारा एक उपक्रमात माझा वाढदिवस माझे झाड या अंतर्गत आमच्या चिमुकल्यांनी आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला आपल्या शाळेसाठी एक झाड (कुंडी सहित) भेट दिले. त्यातून शाळेची फिरती बाग तयार झाली.
शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या उपक्रमाचा पुढील अध्याय म्हणून माझी शाळा माझी परसबाग हा उपक्रम परशुराम राठोड, सुनंदा पाटील, संज्योती कांबरी, अनिता कडलग, रोहिणी राहिंज यांनी सर्व विद्यार्थ्यांना परसबाग फुलवण्याची आणि त्या बागेत विविध प्रकारचा भाजीपाला तयार करण्याची संकल्पना पुढे आली. शाळेत जागे अभावी परसबाग तयार करता येत नव्हती. त्यावेळी ग्रो बॅग चा वापर करून परसबाग करण्याच्या कामी ग्रो बॅग शाळेत नेहमी भेट देणाऱ्या पक्षीप्रेमी आणि पक्षीनिरीक्षक मृणाल घोसाळकर यांनी या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सर्व बॅग या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून माती घेऊन त्या बॅगेत भरून रोपे तयार झाली. बिया पेरून सुंदर परसबाग करण्यात आली. शाळेच्या टेरेसवर ही बाग फुलली आहे. दुमजली शाळेच्या टेरेसवर लोखंडी पाईप उभे करून त्यावर पत्र्याचे छप्पर बनविले आहे. बागेत कोबी, वांगी, पालक, कोथिंबीर, मुळा, मेथी या भाज्या तसेच वेगवगेळी प्रकारची फुले फुलली आहेत. त्यात गुलाब, गोकर्ण, अबोली, सदाफुली, चिनी गुलाब अशी मन प्रसन्न करणारी झाडे लावण्यात आली आहेत.






