धक्कादायक! भाजी विक्रेत्यावर चाकूने वार

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यात भाजी खरेदी करताना झालेल्या वादातून एका ग्राहकाने भाजीविक्रेत्यावर चाकूने वार केला. खडकी येथील संजय गांधी भाजी मंडईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपी ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे गुन्हा दाखल केलेल्या ओरोपीचे नाव आहे. तर, शौकत बाबामियाँ (वय 36, रा. दर्गा वसाहत, खडकी) असे भाजी विक्रेत्याचे नाव आहे. खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत शौकत बाबामियाँ यांचा भाजी विक्री व्यवसाय आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी मनोज स्वामी हा तेथे भाजी खरेदीसाठी आला होता. मात्र, भाजी विकत घेत असताना मनोज स्वामीने शौकत यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली, तसेच त्यांना शिवीगाळही केली. बघता बघता त्यांचा वाद वाढत गेला आणि आरोपीने भाजीविक्रेत्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शौकत यांना मंडईतील इतर भाजी विक्रेत्यानी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या हल्ल्यानंतर आरोपी मनोज पसार झाला असून, खडकी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version