| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माले या गावातील शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये बांधलेले वासरू रात्रीच्या वेळी पळवून नेल्याची घटना घडली. वासरू चोरीला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात आले असून, याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिला शेतकरी या स्वतः पुढाकार घेऊन शेती करीत असून, गोठ्यातून वासरू चोरीला गेल्याने शेतकरी महिला आर्थिक संकटात सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माले गावातील नीलिमा मोकल यांनी घराला लागून असलेल्या गोठ्यात बांधलेल्या वासरूला मध्यरात्री 1.00 वाजता चारा देऊन झोपी गेल्या. त्यानंतर त्या पहाटेच्या सुमारास गोठ्यात गेल्या असता रात्री बांधून ठेवलेल्या ठिकाणी वासरू नव्हते. लक्ष्मी नावाच्या पांढऱ्या रंगाच्या या वासराचा शोध घेतला असता वासरू सापडले नाही. त्यामुळे मोकल यांनी कळंब येथील पोलीस चौकीत जाऊन वासरू हरवल्याची तक्रार दाखल केली. नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट मधील कर्मचारी पोलीस हवालदार महेश गोरे,आणि काळोखे हे अधिक तपास करीत आहेत.






