महाडच्या कृषी महाविद्यालयाचा प्रयोग यशस्वी
| महाड | प्रतिनिधी |
साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रातून किंवा घाटमाथ्यावरून भाजीपाला कोकणच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. मात्र, महाड तालुक्यातील मोहोप्रे-आचळोली येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा समज मोडीत काढला आहे. कोकणच्या मातीत पिकलेला भाजीपाला प्रथमच घाटावरील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्याचा यशस्वी प्रयोग या विद्यार्थ्यांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यात पारंपरिक शेतीचा विकास व लोकांना नैसर्गिक शेतीची आवड निर्माण करून देण्यासाठी महाड तालुक्यातील मोहोप्रे-आचळोली येथील भैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित कृषी महाविद्यालय येथे अनुभवात्मक शिक्षण प्रणाली हा उपक्रम पार पडला. यानुसार अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी शास्त्रीयदृष्ट्या मिरची, वांगी, टोमॅटो, गवार, भेंडी, शिराळी, दुधी भोपळा, काशी भोपळा, काकडी, वाल, कांदा, पांढरा मुळा, झेंडू, कोथिंबीर, पालक, मका, राजमा अशा विविध पिकांचे उत्पादन घेतले. तयार झालेल्या या भाजीपाल्याची विक्री वाई-सातारा येथील बाजारामध्ये केली आहे. घाटावरील बाजारपेठांमधून या मालासाठी भरघोस मागणीदेखील मिळाली आहे. या उपक्रमामधून भरघोस नफा त्याचबरोबर उत्तम प्रतीचा अभ्यासात्मक अनुभवदेखील विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. हा अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नक्कीच फायदेशीर ठरेल, असे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर यांनी सांगितले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर आणि कार्यक्रमाचे पर्यवेक्षण निरीक्षक प्राध्यापक एन. व्ही. सावंत आणि पवार एन. पी. यांचे मार्गदर्शन, सल्ला आणि निरीक्षणामुळे संपूर्ण उपक्रम अतिशय सुरळीत व शिस्तबद्ध रीतीने पार पाडला. या सर्व पिकांचे उत्पादन घेत असताना रोपसंवर्धन, नांगरट व्यवस्था, सिंचन नियोजन, सेंद्रिय आणि रासायनिक खत व्यवस्थापन, कीड व रोगनियंत्रण तंत्र, तणनियंत्रण पद्धती तसेच उत्पादनाचे संकलन आणि हाताळणी यांसारख्या कृषी व्यवस्थापनाच्या सर्व टप्प्यांवर काम केले गेले. विद्यार्थ्यांना कामाचे दैनंदिन नियोजन, वेळ व्यवस्थापन, पिकांच्या वाढीवर आधारित निर्णय घेणे, आवश्यक तेथे सुधारणा करणे तसेच एकमेकांशी समन्वय ठेवून टीमवर्क कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले.
