वाहनचोरास ठोकल्या बेड्या

| पनवेल | वार्ताहर |

वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर कॉपर कॉइल व तांबा चोरीच्या दोन गुन्ह्यांसह वाहनचोरीचा एक गुन्हा पनवेल शहर पोलिसांनी उघडकीस आणला असून, याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ठाणा नाका येथे वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाकडून लावण्यात आलेले ट्रान्सफॉर्मरमधील 2,88,000/- रुपये कि.चे तांबे अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अंजुम बागवान, पो.उप.नि अभय शिंदे, पो.हवा. नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, पो.ना. रवींद्र पारधी, विनोद देशमुख, पो.शि. नितीन कांबळे, प्रसाद घरत, विशाल दुधे, साईनाथ मोकळ आदींचे पथक तांत्रिक तपासामध्ये शोध घेत असता सदरचा गुन्हा हा मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड येथे राहणारा शशी मेंडीस ढोले याने त्याचप्रमाणे त्याचा सहकारी सूरज व रामचंद्र यांच्यासह केले असल्याची खात्रीलायक माहिती या पथकास मिळाली. सदर माहितीच्या आधारे तात्काळ आरोपी शशी मेंडीस ढोले यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून वरील गुन्ह्यासह पनवेल शहर पोलीस ठाणेकडील कॉपर कॉईल चोरीचा अधिक एक गुन्हा व मुंब्रा पोलीस ठाणेकडील वाहनचोरीचा एक गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याच्याकडून कॉपर कॉइल, ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची तार व महिंद्रा कंपनीचा तीन चाकी टेम्पो असा मिळून जवळपास 1,13,050/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्याप्रकरणी एन.आर.आय सागरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.उप.नि.स्वप्नील शेळके व पथक यांनी उपयुक्त माहिती व मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली.

Exit mobile version