| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहातील शौचालयाच्या खिडकीतून रविवारी सायंकाळी पलायन केलेल्या वाहनचोराला अवघ्या सहा तासांत पुन्हा अटक करण्यात कामोठे पोलिसांना यश आले. फरार झाल्यानंतर पोलिसांची विविध पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. अखेर मुंबईतील वडाळा येथील त्याच्या निवासस्थानाजवळ सापळा रचून रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले.
चेतन कातकर (26) असे या आरोपीचे नाव असून, तो मुंबईतील वडाळा परिसरातील गणेशनगर येथे पत्नी व लहान मुलीसह राहतो. शुक्रवारी मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळ परिसरात एका दुचाकीची बॅटरी चोरी करताना वाहनतळावरील कर्मचाऱ्याने त्याला रंगेहात पकडले होते. त्यानंतर कामोठे पोलिसांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली होती. चोरीच्या इतर घटनांबाबत तसेच चोरीच्या दुचाकींची विक्री कोठे आणि कोणाला केली याची चौकशी सुरू असतानाच रविवारी सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी चेतन हा कामोठे पोलीस ठाण्याच्या इमारतीतील स्वच्छतागृहाच्या शौचालयातील खिडकीतून पळून गेला. घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांना विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, पोलीस हवालदार संजय झोळ, पोलीस नाईक सचिन ठोंबरे, संजय दादानवरू आणि पोलीस शिपाई राजेंद्र हिलग यांच्या पथकाने आरोपीच्या वडाळा येथील घराचा शोध घेतला. घराला कुलूप असल्याने पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेत आरोपी फरार असल्याची माहिती दिली आणि त्यांची मदत घेतली. या दरम्यान काही पथके मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम राबवत होती.
मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळ तसेच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकींना चेतन लक्ष्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार, मागील वर्षभरात 35 हून अधिक तर यावर्षी अर्धे वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच 22 दुचाकी चोरीची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी मागील वर्षी 17 तर यंदा आतापर्यंत नऊ वाहनचोरांचा शोध लावण्यात कामोठे पोलिसांना यश आले आहे.
पोलीस ठाण्यातून फरार वाहनचोर सहा तासांत जेरबंद
