अवैध खैराच्या लाकडाची वाहतूक करणारी गाडी जप्त

श्रीवर्धन पोलिसांची धडक कारवाई; चालक वनविभागाच्या ताब्यात

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन पोलिसांनी अवैध खैराच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत गाडी जप्त केली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. बागमंडला जेट्टी परिसरात ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (दि. 7) अवैधरित्या खैराचे लाकूड वाहून नेले जात असल्याची माहिती श्रीवर्धन पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बागमंडला जेट्टी येथे संशयित गाडी अडवून तपासणी केली. यावेळी वाहनामध्ये तांबड्या रंगाचे लाकूड आढळून आले. चौकशीत चालक प्रकाश यशवंत चांदे (रा. कांदिवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याने हे लाकूड खैराचे असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी जप्त वाहन व चालकाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीवर्धन वनविभागाच्या ताब्यात दिले. ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कायपाक, पोलीस शिपाई ठोंबरे व शिंदे यांच्या पथकाने केली.

Exit mobile version