| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल-बदलापूर मार्गावरील भुयारी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच काही महिन्यांपूर्वी येथे अपघाताची घटना घडली होती. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने खबरदारीची उपाययोजना करत भुयारी मार्गाच्या ठिकाणी बॅनर लावून नागरिकांना प्रवेश करू नये, असे स्पष्ट केले. भुयारी मार्गाचे काम अद्याप सुरू असून त्याचे अधिकृत लोकार्पणही झालेले नाही. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गातून वाहतूक सुरू करू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. सध्या या भुयारी मार्गातून कोणत्याही वाहनाची ये-जा होत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी काम सुरू असतानाच काही नागरिकांकडून भुयारी मार्गाचा वापर केला जात होता. त्यातूनच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, अपघातानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत प्रवेश रोखण्यासाठी बॅनर लावले आहेत. भुयारी मार्गातील उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतरच तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून या मार्गात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. लोकार्पणापूर्वीच अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून, मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतुकीसाठी खुला करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
भुयारी मार्गात वाहनांना प्रवेशबंदी
