। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
दिघी-श्रीवर्धन तालुक्यात दोन आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. बोर्लीपंचतनहून श्रीवर्धनकडे जाणार्या मुख्य मार्गावर पाणी वाढल्याने सोमवारी दिवसभर वाहने अडकून पडली होती.
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने आता जोर वाढविला आहे. अतिवृष्टीमुळे श्रीवर्धनमधील शिस्ते, कापोली, खुजारे, आरावी अशा प्रमुख मार्गावर पाणी आले होते. मात्र, या पावसात सर्वत्र पाणी तुंबण्याची अवस्था झाल्याने परिसरातील अनेक शाळा तसेच महाविद्यालयांकडे जाणार्या विद्यार्थ्यांना वाहतूक ठप्प झाल्याने अर्ध्याहुन परतावे लागले.
बोर्लीपंचतन परिसरात सोसाट्याच्या वार्याने पावसाची सुरुवात झाली. पावसाने रात्र गाजवल्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत बोर्लीपंचतन शहराला जोडणारे अनेक मार्ग पाण्याखाली गेले होते. तर दिवेआगर गावामध्ये सखल भागात पुराचे पाणी शिरले. श्रीवर्धन – बोर्लीपंचतन मुख्य मार्गावर खुजारे गावाजवळ नदी ने पूररेषा ओलांडली आहे. मुंबई, पुणे येथून येणार्या -जाणार्या महामंडळच्या गाड्यांना जागेवरच थांबावे लागले. तर या पुरसदृश्य परिस्थितीमुळे खासगी वाहनांना नाईलाजाने परतावे लागले.
श्रीवर्धनमध्ये सोमवारी 245 मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत 1792 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी पावसाचा पुन्हा जोर वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतत पडणार्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. समुद्रदेखील खवळला आहे. पुढचे दोन दिवस हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना श्रीवर्धन प्रशासनाकडून देण्यात येत आहे.