| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण, डोंबिवलीत मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारासाठी उमेदवार, पदाधिकार्यांकडून अधिक संख्येने वाहने वापरली जात आहेत. ही वाहने कार्यक्रम स्थळी, प्रचार कार्यासाठी शहरात वाट्टेल तशी उभी करण्यात येत असल्याने कल्याण, डोंबिवलीत काही दिवसांपासून राजकीय कोंडी सुरू आहे.
या राजकीय वाहनांच्या कोंडीने वाहतूक पोलीसही हैराण आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाग आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्यामागे प्रचारासाठी 30 ते 40 वाहने असा ताफा दररोज शहराच्या विविध भागातून मतदार, ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांच्या भेटीगाठीसाठी फिरत आहेत. ही वाहने उमेदवार, नेता ज्या ठिकाणी थांंबेल तेथे रस्त्याच्या कडेला थांंबवली जातात. उमेदवार, नेता तेथून पुढे जात नाही तोपर्यंत वाहनेही जागीच खोळंंबून राहतात. या कोंडीत मग मुख्य रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीची रिक्षा, बस, खासगी वाहने अडकून पडतात.
मागील काही दिवसांपासून कल्याण, भिवंडी, डोंबिवली शहरांमध्ये हे राजकीय वाहन कोंडीचे प्रकार सुरू असल्याने मतदान करू पण तुमचा वाहनांमधील प्रचार आवरा, असे नागरिक संतप्त होऊन बोलत आहेत. भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकावेळी 30 हून अधिक वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. ही वाहने प्रवाशांची मोठी डोकेदुखी झाली आहे.