ठाण्यात भाजपाची अत्यंत वाईट अवस्था

निष्ठावंतांना डावलून गद्दारांना उमेदवारी

| कल्याण | प्रतिनिधी |

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख ‘नकली शिवसेना’ असा करीत आहेत. मात्र, आयारामांमुळे भाजपचीच अवस्था ‘नकली भाजप’ झाली आहे. रा.स्व.संघ व भाजपच्या ज्या मतदारांना भाजपची ही अवस्था अमान्य असेल त्यांनी खऱ्या हिंदुत्वाकरिता माझ्यासोबत यावे, असे आवाहन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात केले.

दरम्यान, डोंबिलीतील सभेत भाजपचा आमदार गणपत गायकवाड याच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? याचा विचार भाजपच्या नेत्यांनी करावा आणि गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची हिंमत असेल तर नरेंद्र मोदी यांनी चौकशी करावी, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. ठाण्यातील व कल्याणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अनुक्रमे राजन विचारे व वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचाराकरिता ठाकरे यांच्या सभा झाल्या. सभा सुरू होताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात भिजत उध्दव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. मुसळधार पाऊस ही आपल्या विजयाची नांदी आहे. या असल्या पावसात आपली मशाल कधीच विझणार नाही. याऊलट ती अधिक प्रज्वलीत होऊन भाजपसह कल्याण लोकसभेतील गद्दारांना आता गाडून टाकेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाण्यात भाजपची अशी वाईट अवस्था झाली आहे की, त्यांच्याकडे लोकसभेकरिता उमेदवार नाही. जर त्यांच्याकडे उमेदवार असता तर विचारे यांच्यासमोर भाजपचा उमेदवार असता. मात्र, ठाण्यातील भाजप आता गद्दारांच्या सतरंजा उचलण्यापुरता राहिल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, असा प्रचार मोदींनी सुरू केला. गेली 25 वर्षे शिवसेना भाजपासोबत होती तेव्हा भाजपमध्ये विलीन झाली नाही, तर आता कुठल्या पक्षात का विलीन होईल, असा सवालही त्यांनी केला.

गद्दारांची पोरं कडेवर
शिवसेना-भाजपची युती अभेद ठेवण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली. महाजन यांच्यामुळे भाजपला ओळख मिळाली. त्याच महाजन यांच्या मुलीला भाजपने उमेदवारी नाकारली. आपल्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने आता उपरे, गद्दारांची पोरं का कडेवर घेतली आहेत. भाजपचे दोन खासदार होते, त्यावेळी भाजपच्या वाढीसाठी खस्ता खाल्लेल्या महाजन यांच्या निष्ठावान मुलीला घरचा रस्ता आणि गद्दारांच्या पोरांना हे कडेवर घेऊन निवडून आणण्यासाठी चालले आहेत. म्हणजे निष्ठावानांना डावलायचे आणि कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला उमेदवारी द्यायची. मग ही भाजपची वाटचाल संघाला मान्य आहे का, असा प्रश्न उध्दव यांनी केला.
Exit mobile version