वेश्‍वीमध्ये विरोधकांना धसका;शेकापचा बॅनर फाडला

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या वेश्‍वी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीला रंग चढला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर विकासकामे झालेल्या वेश्‍वीमध्ये शेकापचा विरोधकांनी प्रचंड धसका घेतला आहे. त्यामुळे खालच्या पातळीवर घसरलेल्या विरोधकांनी शेकापचे सरपंचपदाचे उमदेवार प्रफुल्ल पाटील यांच्यासह प्रभाग क्र 1 च्या उमेदवारांचा प्रचार करणारा बॅनर फाडण्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे शेकापचे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर संतप्त झाले होते. मात्र बॅनर फाडल्याने शेकापची विकासकामे लपणार नाहीत असे प्रफुल्ल पाटील यांनी सांगत कार्यकर्त्यांना शांत केल्याने पुढील अनर्थ टळला.

वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठया प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. अलिबाग तालुक्यात विकासकामांमध्ये वेश्‍वी ग्रामपंचायत आदर्श ठरली आहे. त्यामुळे शेकापक्षासोबत थेट लढता येणे शक्य नसल्याने शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटासोबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्र येत प्रचार सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे आणि तत्कालिन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करणार्‍या शिंदे गटाच्या बंडखोर आमदाराच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करीत फिरणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत जिल्ह्यात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रचाराला जोर चढत असतानाच शेकापक्षाविरोधात प्रचार करायला मुद्देच नसल्याने विरोधकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी शेकापक्षात प्रवेश केल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याने त्यांनी रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारी आरसीएफ कॉलनी येथील कान्होजी आंग्रे यांच्या पुतळ्याजवळच्या परिसरात लावण्यात आलेला प्रफुल्ल पाटील यांचा प्रभाग क्र. एकच्या उमेदवारांच्या प्रचाराचा बॅनर विरोधकांनी फाडला. हा प्रकार लक्षात येताच वेश्‍वीतील शेकापचे कार्यकर्ते संतप्त झाले. मात्र प्रफुल्ल पाटील यांनी अशा परिस्थितीत देखील संयम दाखवित कार्यकर्त्यांना शांत केले.

विरोधकांकडे आपल्या विरोधात लढण्यासाठी मुद्देच उरले नसल्याने ते या पातळीवर घसरले आहेत. एखाद दुसरा बॅनर फाडल्याने वेश्‍वीतील शेकापक्षाने केलेली विकासकामे लपणार नाहीत हे त्यांनी कार्यकर्त्यांना पटवून देत शांत राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आता काहीच कामे करण्यासारखे राहिले नसल्याने शेकापविरोधात प्रचार करण्यासाठी विरोधकांकडे मुद्देच उरले नाहीत. त्यामुळे ते या पातळीवर उतरले आहेत. बॅनर फाडून शेकापचे काम झाकले जाणार नाही.

प्रफुल्ल पाटील, सरपंच पदाचे उमेदवार, शेतकरी कामगार पक्ष

Exit mobile version