पीएनपी संकुलात वीरमातांचा सन्मान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वेश्‍वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वीरों का सन्मान’ या योजनेंतर्गत वीरमाता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणारे व देश सेवेसाठी मातेचे पाठबळ मिळणारे आपल्या अलिबाग तालुक्यातील सहाणगोठीचे भूमिपुत्र शहीद निलेश तुणतुणे यांच्या परिवाराचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओंमकार पोटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पल्लवी पाटील तसेच प्रा. कैलास सिंग राजपूत व तुणतुणे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांच्या हस्ते वीरमाता निर्मला तुणतुणे यांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला, तसेच वडिलांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी मातेने आपल्या शहीद पुत्राच्या गोड आठवणींना उजाळा व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

अध्यक्षीय मार्गदर्शन प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना करताना सांगितले की, तुम्ही आर्मी भरतीसाठी उच्च दर्जाची तयारी करून देशाचे सैनिक होण्याचा मान मिळवू शकता व या भारतमातेची सेवा करू शकता. ध्येय निश्‍चित असेल तर यश निश्‍चित मिळते, सैनिकांचे समाजातील स्थान हे बहुमूल्य आहे आणि ते स्थान मिळवायचे आपण स्वप्न उदरात बाळगले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. पल्लवी पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. कैलास सिंग राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Exit mobile version