विचुंबे पूल वाहतुकीस धोकादायक

अवजड वाहने व बस सेवा बंद
| पनवेल | वार्ताहर |

पनवेल रेल्वे स्थानकाची पूर्व बाजू ते विचुंबे गावाला जोडणार्‍या गाढी नदीवरील पूल हा एका बाजूला खचला असून, तो धोकादायक बनला आहे. विचुंबे गावात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून, या पुलावरून जाणारी एनएमएमटीची बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वेळीच या पुलाचे बांधकाम हाती घेतले असते, तर ही वेळ आली नसती, अशी संतापजनक प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. पुलाची दुरुस्ती न झाल्यास प्रवाशांना तीन आसनी रिक्षांशिवाय पर्याय उरणार नाही. तर 10 रुपये बसच्या तिकीट भाड्याचा प्रवास 20 ते 30 रुपये खर्च करून करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने 27 जून रोजी ग्रामपंचायतीला या पुलावरून हलकी वाहने वगळता अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्याचे पत्र दिले आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतीने एनएमएमटी प्रशासनाला पत्र पाठवून सध्या सुरू असणारी 59 क्रमांकाची जादा बस सेवा बंद करावी, असे कळविले आहे. दोन वर्षांपूर्वी पुलाचे सर्वेक्षण झाले असून, पूल धोकादायक जाहीर करण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यास ग्रामपंचायत जबाबदार ठरणार आहे. अवजड वाहने व बस सेवेची वाहतूक उसर्गीमार्गे करणे हा एकमेव पर्याय आम्हा ग्रामस्थांसमोर आहे. एक मोठी बस अरुंद पुलावरून गेल्यास दोन तास वाहतूक कोंडी होते, त्यामुळे बस वाहतूक बंद करावी लागत असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

Exit mobile version