पीडितेच्या नातेवाईकांना राजकीय मंडळींचा त्रास

नराधमाला जिल्हा कारागृहात केले रवाना

| पेण | प्रतिनिधी |

पेण येथील अल्पवयीन मुलीवर सहा महिने अत्याचार करणार्‍या भाजप महिला पदाधिकारी यांचा मुलगा मनीष नरेंद्र म्हात्रे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जिल्हा कारागृहात रवाना केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणात पीडित मुलीच्या घरी दबाव टाकण्यासाठी काही राजकीय मंडळी ये-जा करत असून, त्यांना उलटसुलट प्रश्‍न विचारुन त्रास देत आहेत. एकंदरीत, राजकीय बळाचा उपयोग या प्रकरणात केला जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच शिवसेना उबाठा गटाने या गुन्ह्यातील आरोपी मनीष म्हात्रे याची आई वंदना म्हात्रे यांना त्वरित जिल्हा शांतता कमिटीवरुन बरखास्त करावे, अशी मागणी केली होती. परंतु, आजतागायत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वंदना म्हात्रे यांना बडतर्फ केले नाही, त्यामुळेच कळत-नकळत राजकीय बळाचा उपयोग होऊन पीडितेच्या नातेवाईकांना याचा त्रास होत आहे.

या अल्पवयीन पीडित मुलीला गेली सहा महिने नरक यातना सहन कराव्या लागल्या आहेत. त्यातच मेडिकल तपासणीअंती मोठी धक्कादायक बातमी बाहेर आली आहे. याचा विचार करता, या प्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होणे गरजेचे आहे. परंतु, आरोपीवर राजकीय वरदहस्त असल्याने पेण येथील काही स्वतःला महिला समाजसेवक म्हणणार्‍या मंडळी मूग गिळून बसलेल्या पाहायला मिळत आहेत, तर शिवसेना उबाठा गट वगळता कोणीही राजकीय मंडळींनी या प्रकरणात ब्र शब्ददेखील काढलेला नाही. पेण तालुक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी ज्यावेळेला महिलांवर अत्याचार झाला, त्यावेळी मोर्चा काढणारी मंडळी आज गप्प का? असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणात मोठ्या प्रमाण राजकीय हस्तक्षेप आजही होत आहे, एवढं निश्‍चित. त्यामुळे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन पीडितेच्या नातेवाईकांना संरक्षण देण्याची मागणी करणार आहेत.

Exit mobile version