। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचा दिग्गज तिरंदाज राकेश कुमार याने विजयी धडाका कायम राखताना पुरुष कम्पाऊंड खुल्या गटाच्या उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशस केला आहे. त्याने सेनेगलच्या एलिओ ड्रॅमचा 136-131 असा पराभव केला. या लढतीदरम्यान पॅरिसमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. परंतु, त्यानंतरही राकेशची एकाग्रता किंचतही हलली नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूकडे मोठी आघाडी होती, परंतु राकेशने शेवटपर्यंत हार न मानता अनुभवाच्या जोरावर विजय मिळवला.
आशियाई पॅरा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या राकेशला टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली होती. त्याने पॅरिसमध्ये अचुक 10 निशाण साधून चांगली सुरुवात केली आणि पहिल्या टप्प्यात 3 गुणांची आघाडी घेतली. एलिओने दुसरा गेम 1 गुणाच्या फरकाने जिंकला आणि त्यानंतर राकेशने तिसरा गेम दोन अचुक 10 निशाण साधून 5 गुणांच्या फरकाने खिशात घातला. चौथ्या फेरीनंतर ही आघाडी 6 अशी झाली. एलिओने शेवटप्या फेरीत तीन प्रयत्नांत फक्त 1 गुण गमावला. परंतु, राकेशने उल्लेखनीय कामगिरी करून विजय पक्का केला. यापूर्वी राकेश आणि शीतल देवी यांनी मिश्र सांघिक गटात 1399 गुणांसह विश्व विक्रम नोंदवला होता.