| पेण | प्रतिनिधी |
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण येथील उमेदवार उच्चशिक्षित आणि अभ्यासू असून, त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. चारही उमेदवार विधिमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून न्याय मिळवून देतील, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पेण मतदारसंघाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन रविवारी (दि. 17) करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
जयंत पाटील यांनी भाजपचे उमेदवार रवीशेठ पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अतुल म्हात्रे हेच योग्य उमेदवार कसे आहेत हे सांगत असताना ते म्हणाले की, मी दिलेले चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि अभ्यासू आहेत. त्यामुळे माझे उमेदवार विधिमंडळामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडतील. पेण विधानसभा मतदारसंघातील आमदार रविशेठ पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत विधिमंडळात किती प्रश्न मांडले? आणि किती प्रश्न सोडवून घेतले? माझे जाहीर आवाहन रविशेठ पाटील यांना आहे की, नैना, एमआयडीसी, एमएमआरडी या विषयांवर रविशेठ पाटील यांनी अतुल म्हात्रे यांच्यासोबत फक्त 15 मिनिटेच चर्चा करावी, आमची उमेदवारी मागे घेतो. परंतु, असे रविशेठ पाटील करणार नाहीत.
पुढे जयंत पाटील यांनी मतदारांना आवाहन केले की, तुम्हाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे की पैसे घेऊन गप्प बसायचे आहे. शेतीचे पैसे नको तर पार्टनशिप हवी. त्यामुळे अतुल म्हात्रेसारखा अभ्यासू आमदार होणे गरजेचे आहे. येत्या दोन-तीन वर्षांत खारेपाटातील दोन ते तीन हजार बिर्ल्डर बनविण्याची ताकद अतुल म्हात्रे यांच्याकडे आहे. मग पार्टनशिप देणारा आमदार हवा की दलाली करणारा? या दलालांना आता हद्दपार करणे गरजेचे आहे. तिसर्या उमेदवाराला तर मी गणतीतच पकडत नाही. तीन पक्ष बदलून चौथ्या पक्षात जाणारा विश्वासघातकी माणूस आपल्याला आमदार हवा का? पेणच्या सर्वांगीण विकासासाठी अतुल म्हात्रे यांना निवडून द्या. मी आज पूर्ण जबाबदारीने शब्द देतो, अतुल म्हात्रे आमदार झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत अंतोरावरून भालपर्यंत गॅ्रव्हिटीने पाणी पोहोचवतो. तसेच रविशेठ पाटील यांना माझा सवाल आहे, अतुलला फॉरेन रिर्टन पार्सल म्हणत असाल, तर बॅ. ए.टी. पाटील कोण होते? आज जनता अतुल म्हात्रे यांच्यासोबत आहे. त्यामुळे 23 तारखेला विजय हा निश्चित अतुल म्हात्रे यांचाच आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक मोकल, राजाराम पाटील, संजय जांभळे आदींनी आपले विचार मांडले. तर उमेदवार अतुल म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, 23 तारखेला विजयी आम्हीच होणार, शिट्टीचा आवाज पूर्ण रायगडमध्ये ऐकायला मिळणार. जे म्हणतात की, शेतकरी कामगार पक्ष संपला, त्यांना माझे विचारणे आहे की, ही मोठ्या संख्येने जमलेले लोक कोण आहेत? शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता माझ्यासोबत आहे. ज्यावेळी मी जनसंवाद यात्रेच्या दरम्यात ग्रामीण भागात फिरत होतो, तेव्हा सर्वसामान्य आपणहून समस्या व सूचना सांगत होत्या. मी भविष्यात या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून दाखवेन. फक्त एक संधी मला द्या. आज मूलभूत गरजा ही या मतदारसंघात लोकप्रतिनिधींना पूर्ण करता आल्या नाहीत. पाणी, आरोग्य, रस्ते या सुविधा जर आपण देऊ शकलो नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण अपयशी आहात. त्यामुळे भविष्यात पेण विधानसभा मतदार संघात विकासकाम कशाला म्हणतात याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिकच दाखविल. तसेच नैना, एमएमआरडी याविषयीही त्यांनी भाष्य करून शेतकर्यांना विकासाच्या प्रक्रियेत कसे सामील केले जाईल, याविषयीदेखील मार्गदर्शन केले.
बिनकामाचा आमदार काय कामाचा?
विधिमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा आपल्याला आमदार हवा की फक्त विधिमंडळात जाऊन बसणारा आमदार हवा? या पेणकरांच्या गणपतीचा प्रश्न मी विधिमंडळात मांडला. तो मार्गी लावला. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गणपती कारखानदारांकडे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण, गणपती कारखानदारांच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प होते. रविशेठ पाटील यांच्या विकासाची व्याख्या काय? हे शहरवासियांना चांगले माहीत आहे. 10 रुपयांच्या विकासकामाला 100 रूपयांची निविदा काढणे आणि उरलेले 90 रूपये आपल्याकडे जमा करणे. पेण शहराच्या मूलभूत गरजा ही भागवू शकत नाहीत, असा बिनकामी आमदार काय कामाचा, असा हल्लाबोल रवीशेठ पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी केला.
चित्रलेखा पाटील यांना मताधिक्य मिळणार
अलिबागमध्ये तर मोठ्या मताधिक्यांनी चित्रलेखा पाटील येणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. उरणमध्ये प्रीतम म्हात्रेदेखील निवडून येणारच आणि पनवेलमध्ये पैसेवाल्यांची मस्ती बाळाराम पाटील उतरवणार याची मला पूर्ण खात्री आहे. शेवटी अतुल म्हात्रे यांच्या शिट्टी या निशाणीला मतदान करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.