अल्काराझ, मेदवेदेवची विजयी वाटचाल

अँडी मरेचे आव्हान संपुष्टात, दुहेरीत भारतीयांचा पराभव

| न्यूयॉर्क | वृत्तसंस्था|

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम या टेनिस स्पर्धेत पहिला मानांकित कार्लोस अल्काराझ व तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. स्पेनचा युवा स्टार अल्काराझच्या झंझावाती खेळासमोर लॉईड हॅरिस याचा निभाव लागला नाही. अल्काराझने या लढतीत 6-3, 6-1, 7-6 असा सरळ तीन सेटमध्ये विजय संपादन केला. अल्काराझने प्रतिस्पर्ध्याला दोन तास व 28 मिनिटांमध्ये नमवले.

रशियाच्या मेदवेदेव याला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. 2021मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या मेदवेदेव याने ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्तोफर ओकोनेल याचे कडवे आव्हान 6-2, 6-2, 6-7, 6-2 असे परतवून लावले. मेदवेदेव याने तीन तास व चार मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली.

युकी, साकेतकडून दुहेरीत निराशा
भारतीय टेनिसपटूंना गुरुवारी मध्यरात्री झालेल्या दुहेरी विभागातील लढतींमध्ये निराशेला सामोरे जावे लागले. युकी भांब्री व साकेत मायनेनी या दोन्ही भारतीयांना आपापल्या सहकाऱ्यांसोबत पराभवाचा सामना करावा लागला. हुगो निस-जॅन झिलिंस्की या पोलंडच्या जोडीकडून युकी व त्याचा जोडीदार मार्सेलो डेमोलिनर (ब्राझील) यांचा 6-3, 7-5 असा पराभव झाला. साकेत व त्याचा रशियाचा सहकारी लेक्स करातसेव या जोडीने पहिला सेट 7-6 असा जिंकला; मात्र पुढील दोन सेटमध्ये सर्बियाचा लास्लो जेरे व स्वित्झर्लंडचा मार्क ह्युसरल यांच्या जोडीने 6-3, 6-2 असा विजय मिळवत पुढे पाऊल टाकले.

Exit mobile version