कामगार एकजुटीचा विजय; सीडब्ल्यूसी कंपनीसमोर प्रशासन नरमले

मागण्या मान्य झाल्याने कामगारांमध्ये आनंद
| उरण | वार्ताहर |
भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील पोलारीस लॉजिस्टीक पार्क (सीडब्ल्यूसी) कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्याने कामगारांनी, भेंडखळ ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. उरण तालुक्यात 27 फेब्रुवारीपासून भेंडखळ गावातील 503 स्थानिक भूमीपुत्रांनी आपल्या विविध मागण्यांसाठी भेंडखळ ग्रामपंचायत असलेल्या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सीडब्ल्यूसी) कंपनी समोर साखळी उपोषण सुरू केले होते. पोलारीस कंपनी प्रशासन कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येताच कामगारांनी शुक्रवारी 3 मार्च रोजी गेट बंद आंदोलन केले होते.

सदर गेट बंद आंदोलन हे रायगड श्रमिक संघटना व न्यू मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटन यांच्या नेतृत्वाखाली लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी सर्वच राजकीय पक्षाचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा होता. सर्वच राजकीय पक्षाचे सहकार्य या आंदोलनाला मिळाले. विविध सामाजिक संस्था, संघटनांनीसुद्धा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.

कामगारांच्या एकजुटीमुळे व गेट बंद आंदोलन केल्याने पोलारीस कंपनी शेवटी कामगारांसोबत चर्चेस तयार झाली. 4 मार्च रोजी पोलारीस कंपनीच्या हॉलमध्ये कंपनी प्रशासन, कामगार प्रतिनिधी, ग्रामस्थ, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या बैठकीसाठी पोलारीस कंपनी डायरेक्टर जेकब थॉमस, पोलारीस कंपनी डायरेक्टर संतोष शेट्टी, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कामगार नेते भूषण पाटील, शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस विकास नाईक, कामगार नेते महादेव घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, एल.बी. पाटील यांच्यासह ग्रामपंचायत भेंडखळचे सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version