भारत पेट्रोलियमची विजयी सलामी

| मुंबई | प्रतिनिधी |

भारत पेट्रोलियम, महिंद्रा, मुंबई बंदर, मुंबई महानगर पालिका यांनी शिवनेरी सेवा मंडळ आयोजित विशेष व्यावसायिक गट जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी सलामी. दादर (पूर्व), शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर झालेल्या उदघाटनिय सामन्यात भारत पेट्रोलियम संघाने मध्य रेल्वे डिव्ही. संघाला 39-20 अशी धूळ चारत ‘अ’ गटात पहिल्या साखळी विजयाची नोंद केली.

‘क’ गटात अत्यंत चुरशीने गेलेल्या सामन्यात मुंबई बंदर संघाने पहिल्या डावातील 10-16 अशी 6 गुणांची पिछाडी भरून काढत न्यू इंडिया इन्सु.ला 36-35 असे नमवित पहिला विजय मिळविला. ‘ड’ गटात मुंबई महानगर पालिकेने जे. जे. रुग्णालय संघाला 44-13 असे सहज नमवित आपली विजयी घोडदौड सुरू केली. ‘इ’ गटात बँक ऑफ बडोदाने माझगाव डॉकचा 50-15 असा पाडाव करीत आगेकूच केली.

प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात रिझर्व्ह बँकेने सचिवालय जिमखान्याला 42-25 असे नमवित दुसरी फेरी गाठली. चिनू स्पोर्टने मध्यांतरातील 17-21 अशा 4 गुणांच्या पिछाडीवरून सी.बी.सी. स्पोर्ट्सचा 34-32 असा निसटता पराभव केला. 5-5 चढायांच्या डावात फ्लोरिटेक्सने गंधे इलेक्ट्रिकचा कडवा प्रतिकार 43-39 (8-4) असा परतवून लावत प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात दुसरी फेरी गाठली. पहिल्या डावात 19-11 अशी आघाडी घेणार्‍या गंधे इलेक्ट्रिकला पूर्ण डावात फ्लोरिटेक्सने 35-35 असे बरोबरीत रोखले. शेवटच्या सामन्यात समर्थने बेस्टला 44-18 असे नमवित आगेकूच केली.

Exit mobile version