पुणे आर्मीची विजयी सलामी
| वाडा-पालघर | प्रतिनिधी |
मध्य रेल्वे, युनियन बँक, महाराष्ट्र पोलीस व पुणे आर्मी यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. संस्थापक अध्यक्ष निलेशजी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा-पालघर येथील नाना थोरात क्रीडांगणावर सुरू झालेल्या उदघाटनिय पुरुषांच्या अ गटाच्या साखळी सामन्यात मध्य रेल्वेने मुंबई महानगर पालिकेला 31-29 असे चकवीत विजयी सलामी दिली. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंटावेधक ठरलेल्या या सामन्यात मध्यांताराला 13-12 अशी आघाडी रेल्वेकडे होती. गुरविंदर सिंगचा चतुरस्त्र खेळ मध्य रेल्वेच्या विजयात महत्वाचा ठरला. मुंबई पालिकेच्या आकाश गायकवाड याने कडवी लढत दिली. पण संघाला तो विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
ब गटात युनियन बँकेने ठाणे महानगर पालिकेला 30-26 असे पराभूत करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. विजय अनाफट, आकाश कदम यांच्या चढाई-पकडीच्या खेळाने या विजयाची किमया साधली. विश्रांतीला 15-13 अशी आघाडी बँकेकडे होती. अक्षय मकवाना, अतुल दिसले यांचा उत्कृष्ट खेळ ठाणे पालिकेचा पराभव टाळण्यात थोडा कमी पडला. महाराष्ट्र पोलिसने क गटात सेंट्रल बँकेला 40-31 अशी धूळ चारत आगेकूच केली. सुलतान डांगे, महेश मगदूम यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर पहिल्या डावात 21-09 अशी भक्कम आघाडी घेणार्या पोलिसांना दुसर्या डावात मात्र कडव्या प्रतिकाराला सामोरी जावे लागले. बँकेच्या अभिजित घाटे, परदेशी यानी दमदार खेळ करीत पोलिसांना कडवी लढत दिली. पण संघाला पराभवापासून वाचविण्यात त्यांचा खेळ कमी पडला. पुणे आर्मीने ड गटात सीजीएसटी-कस्टमचा 34-28असा पाडाव करीत आपली विजयी घोडदौड सुरू केली. मध्यांताराला 21-11 अशी आघाडी घेणार्या आर्मीला उत्तरार्धात मात्र कस्टमने चांगलेच झुंजविले. पुण्याकडून नितीन चिले, सिद्धेश सावंत तर, कस्टमकडून सुनील दुबिले, ऋतुराज कोरवी, विकास काळे यांनी चढाई-पकडीचा उत्कृष्ट खेळ केला. या स्पर्धेचे उदघाटन रविंद्र फाटक, गोठ्या सावंत, निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत पार पडला.